Power by The Web Cloud Media

मोठागाव रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाला गती द्या

आमदार राजेश मोरे यांची आयुक्तांकडे मागणी

डोंबिवली

डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव येथे दिवा-वसई रेल्वे मार्गावरील प्रस्तावित रेल्वे उड्डाणपुलाच्या (ROB) कामाला गती देण्यासाठी कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेत निविदा प्रक्रिया तातडीने सुरू करण्याची मागणी केली.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या महत्त्वाच्या उड्डाणपुलाला मंजुरी मिळाली आहे. मात्र मंजुरीनंतरही प्रत्यक्ष कामाला अपेक्षित गती मिळत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी असल्याचे आमदार मोरे यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले.

मोठागाव परिसरात मानकोली खाडी पुलावर वाहतूक सुरू झाल्यानंतर रेल्वे फाटक परिसरात वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे नागरिकांचा वेळ व इंधन वाया जात असून रेल्वे रुळ ओलांडताना अपघातांचाही धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर उड्डाणपूल हा परिसरासाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प असल्याचे आमदार मोरे यांनी स्पष्ट केले.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश कदम आणि शहर अभियंता अनिता परदेशी उपस्थित होत्या. आयुक्त अभिनव गोयल यांनी या कामाची निविदा प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून प्रकल्पाला गती दिली जाईल, असे आश्वासन दिल्याची माहिती देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *