Power by The Web Cloud Media

ठाणे आणि घाटकोपरमध्ये संत निरंकारी रक्तदान शिबिर

कल्याण

संत निरंकारी मिशनच्या सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने ठाणे आणि कामराज नगर, घाटकोपर येथे आयोजित करण्यात आलेल्या दोन रक्तदान शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या दोन्ही शिबिरांत एकूण 340 युनिट रक्त संकलित करण्यात आले.

निरंकारी सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता रमितजी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आशीर्वादाने रविवारी या रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. संत निरंकारी रक्तपेढी, विलेपार्ले, मुंबई यांच्या माध्यमातून दोन्ही ठिकाणी रक्तसंकलन करण्यात आले.

ठाण्यात 232 जणांचे रक्तदान

संत निरंकारी सत्संग भवन, गणेशवाडी, ठाणे येथे आयोजित रक्तदान शिबिरात 232 निरंकारी भक्तांनी रक्तदान केले. ठाणे आणि कोपरी विभागातील रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विविध वयोगटातील भक्तांनी सहभागी होत सामाजिक बांधिलकी आणि मानवतावादी सेवाभाव अधोरेखित केला.

संत निरंकारी मंडळाचे ब्रह्मज्ञान प्रचारक मिथिलेश कुमार यांच्या उपस्थितीत निरंकार प्रभूच्या प्रार्थनेने शिबिराचा शुभारंभ झाला. यावेळी आमदार संजय केळकर, आमदार ॲड. निरंजन डावखरे, ठाणे जिल्हा विधी विभागाचे सचिव रवींद्र पाजणकर, उथळसर प्रभाग समितीचे अध्यक्ष व वरिष्ठ नगरसेवक नारायण पवार, तसेच मालती पाटील आणि माधुरी मेटांगे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी संत निरंकारी मिशनच्या रक्तदान उपक्रमाचे कौतुक केले.

सेक्टर संयोजक सुभाष भोसले तसेच स्थानिक मुखी, प्रबंधक आणि सेवादल अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली ठाण्यातील रक्तदान शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.

घाटकोपरमध्ये 108 जणांचे रक्तदान

संत निरंकारी सत्संग भवन, कामराज नगर, घाटकोपर येथे झालेल्या रक्तदान अभियानात 141 बंधू-भगिनींनी सहभाग नोंदविला. आवश्यक वैद्यकीय तपासणीनंतर त्यापैकी 108 जणांनी यशस्वीरित्या रक्तदान केले.

रक्तदानाचे महत्त्व आणि त्याबाबत जनजागृती करण्यासाठी शिबिराच्या आदल्या दिवशी, शनिवारी सकाळी प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते. भक्तगण आणि सेवादल स्वयंसेवकांनी प्रभातफेरीत सहभागी होत नागरिकांना रक्तदानासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. यावेळी नगरसेविका निर्मिती कानडे यांनी उपस्थित राहून उपक्रमाचे कौतुक केले.

ठाणे आणि घाटकोपर येथील या दोन्ही शिबिरांतून संकलित झालेले 340 युनिट रक्त गरजू रुग्णांसाठी उपयुक्त ठरणार असून, रक्तदानाच्या माध्यमातून सामाजिक सेवेचा संदेश देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *