Power by The Web Cloud Media

‘मनोरंजनातून प्रबोधन, प्रबोधनातून परिवर्तन’

कर्जत येथे पथनाट्य-गीत प्रशिक्षणातून प्रबोधनाची नवी तयारी

कर्जत

पथनाट्य आणि गीतांच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधनाला प्रभावी स्वरूप देण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सांस्कृतिक अभिव्यक्ती विभागातर्फे कोकण विभागाचे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिर कर्जत येथे पार पडले. ३ आणि ४ ऑक्टोबर रोजी प्रकाश मोहाडीकर नॉलेज पार्क सिटी येथे झालेल्या या शिबिरात ठाणे, मुंबई, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि पालघर या सहा जिल्ह्यांतील ४८ प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेतला.

‘मनोरंजनातून प्रबोधन’चा मूलमंत्र
समितीचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. सामाजिक विषय लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी कला आणि मनोरंजनाचा वापर करण्यावर शिबिरात भर देण्यात आला. ‘मनोरंजनातून प्रबोधन आणि प्रबोधनातून परिवर्तन’ हा शिबिराचा प्रमुख विचार होता.

पथनाट्य आणि गीतांचे तज्ज्ञ प्रशिक्षण
अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक दामोदर कोळी यांनी पथनाट्याचे प्रशिक्षण दिले. चळवळीतील गीतांचे प्रशिक्षण सांस्कृतिक अभिव्यक्ती विभागाचे राज्य कार्यवाह अनिल शोभना वसंत आणि युवा सहभाग विभागाच्या राज्य कार्यवाह प्रियांका खेडेकर यांनी दिले.

प्रशिक्षणादरम्यान आवाजाची तयारी, लय-ताल, गायन, शरीरभाषा, स्व-शोध, पथनाट्य संवाद, तालीम तसेच पथनाट्य आणि गीतांचे प्रत्यक्ष सादरीकरण अशा विविध सत्रांचे आयोजन करण्यात आले.

सहा जिल्ह्यांतील कार्यकर्त्यांचा सहभाग
शिबिरात समितीच्या राज्य सरचिटणीस आरती नाईक यांनी उपस्थित राहून मनोगत व्यक्त केले. सांस्कृतिक अभिव्यक्ती विभागाचे राज्य सहकार्यवाह सचिन गोवळकर यांनीही सहभाग घेतला. रुपेश यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रियांका सवाखंडे यांनी आभार मानले.

शिबिराच्या आयोजनासाठी ठाणे जिल्ह्यातील साथी डॉ. सुषमा बसवंत, किरण ईशी, ज्योती मेश्राम, छाया गायकवाड, ॲड. प्रज्ञा चव्हाण, मंगल मोरे, दिवेंद्र मोरे आणि पिराजी सातपुते तसेच रायगड जिल्ह्यातील संदीप गायकवाड, विकास वल्हे आणि प्रियांका सवाखंडे यांनी योगदान दिले. नियोजनबद्ध प्रयत्नांतून शिबिर यशस्वीपणे पार पडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *