‘शिक्षणाची वारी’तून विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा जागर
कल्याण
टाळ-मृदंगाचा नाद, विठ्ठल नामाचा गजर आणि बालवारकऱ्यांची दिंडी… आषाढी एकादशीनिमित्त कल्याणमधील सम्राट अशोक विद्यालयाचे वातावरण भक्तिमय झाले. मात्र ही वारी केवळ भक्तीची नव्हती; ‘शिक्षणाची वारी, पांडुरंग आपल्या दारी; अभ्यास करूया घरी’ असा संदेश देत विद्यार्थ्यांनी शिक्षणाचे महत्त्वही अधोरेखित केले.
पाली भाषा प्रचार आणि प्रसार ट्रस्ट संचलित सम्राट अशोक विद्यालयात विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी विविध उपक्रम राबविले जातात. त्याचाच भाग म्हणून आषाढी एकादशीनिमित्त शाळेच्या मैदानावर बालवारकऱ्यांनी गोल रिंगण साकारले. नाचत-गात आणि विठ्ठल नामाचा जयघोष करत विद्यार्थ्यांनी भक्तिमय सोहळ्याचा आनंद घेतला.
यानंतर परिसरातून दिंडी काढण्यात आली. पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेत टाळ-मृदंगाच्या साथीने सहभाग नोंदविला. भक्तीच्या या वातावरणाला ‘अभ्यास करूया घरी’ या घोषवाक्याची जोड देत शाळेने वारीच्या परंपरेतून शिक्षणाचा संदेश दिला.
विठ्ठलाच्या भूमिकेत संभव राठोड, रुक्मिणीच्या भूमिकेत तिथी केळबेकर, तर मुक्ताईच्या भूमिकेत संस्कृती जाधव सहभागी झाली. अर्णव मडके, रिद्रिक पाटील आणि प्रिन्स बनसोडे यांनीही संतांच्या भूमिका साकारत उपस्थितांचे लक्ष वेधले. सहशिक्षिका संगीता सतीश पाटील यांनी मुक्ताईची भूमिका साकारली. इतर शिक्षकांनीही या भक्तिमय सोहळ्यात सहभाग घेतला.













Leave a Reply