Power by The Web Cloud Media

Kalyan : देवगंधर्व महोत्सवाची सांगता

कल्याण

कल्याण डोंबिवलीतील रसिकमान्य देवगंधर्व महोत्सवाची रविवारी सांगता झाली. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्राची सुरवात रसिकप्रिय शास्त्रीय गायिका गौरी पाठारे यांच्या गायनाने झाली. आपल्या दमदार तरीही गोड अशा आवाजाने त्यांनी सुरवातीपासूनच रसिकांची पकड घेतली.

मारवा रागातील विलंबित झुमरामधील “पिया मोरे”  व त्या नंतर “मोरा रे तुम्हीसन लागी” आणि “ऐसो तुम झटकी बैया” या अनुक्रमे द्रुत तीनताल व द्रुत एकतालातील जोड बंदिशींनी मैफिल सुरू झाली. त्यानंतर भूप रागातील रूपक तालातल्या “जब ही सब निरपत” , त्रितालातील “इतन जोबन पर” व नुमन जोबन मान दावे” या पारंपारिक बंदिशी रसिकांना ऐकायला मिळाल्या.  “पिया बिन मोरा, कैसा जिया तरसत” ह्या ठुमरीने मैफिलीची सांगता झाली. हार्मोनियम साथ आदित्य ओक तर तबला साथ पं. मुकुंदराज देव यांची होती. तानपुऱ्यावर श्रावणी ज्ञाते आणि वर्षा पवार यांनी साथ दिली.

यानंतर देवगंधर्व महोत्सवाच्या प्रथेनुसार स्मरणिकेचे प्रकाशन झाले. “रियाझ” या विषयाला समर्पित अशा या स्मरणिकेचे प्रकाशन महोत्सवाचे अध्यक्ष डॉ. अविनाश सुपे, उपाध्यक्ष सुप्रसिद्ध वकील सचिन शेटे व गायिका गौरी पाठारे  यांच्याहस्ते झाले. स्मरणिकेतील “रियाझ” या विषयावरील लेख हे संगीताच्या विद्यार्थ्यांना नक्कीच मार्गदर्शक ठरतील असा विश्वास संपादक अतुल वझे यांनी व्यक्त केला. यानंतर चिटणीस मोहित ताम्हनकर यांनी महोत्सवाला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.

महोत्सवाच्या शेवटच्या सत्रात आघाडीचे बासरीवादक पं. प्रवीण गोडखिंडी यांचे वादन रसिकांना ऐकायला मिळाले. राग मारू बिहागने सुरवात झालेली मैफिल विलंबित एकताल, द्रुत त्रिताल अशा तालात खेळत, गायकी अंगाने पुढे गेली.  मारू बिहाग नंतर रागेश्री मधील मत्त तालातील व नंतर द्रुत त्रितालातील रचना श्रोत्यांना सुखावून गेल्या. अतिशय पूरक आणि रंगतदार अशी तबला साथ विख्यात तबलावादक सत्यजित तळवलकर यांची होती. संपू नये असं वाटत असतानाच कार्यक्रमाची व यावर्षीच्या देवगंधर्व महोत्सवाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *