बॉटलनेक दूर करणे, खड्ड्यांची कायमस्वरूपी दुरुस्ती,
अनधिकृत पार्किंगवर कारवाई; वीज खांब-रोहित्रांच्या स्थलांतराचाही निर्णय
कल्याण : कल्याण-शिळ रोड, शिळफाटा ते मुंब्रा-दहिसर तसेच १४ गाव परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर तातडीच्या आणि दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी विविध शासकीय यंत्रणांनी संयुक्त पाहणी केली. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त संजय शिरसाठ यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी (२७ जुलै) हा पाहणी दौरा करण्यात आला. यावेळी रस्त्यावरील बॉटलनेक, खड्डे, अनधिकृत पार्किंग, राँग साईड वाहतूक, सिग्नल व्यवस्था आणि वाहतुकीला अडथळा ठरणारे वीज खांब आदी समस्यांवर विभागनिहाय कृती आराखडा राबविण्याबाबत चर्चा करण्यात आली.
कल्याण-डोंबिवली परिसरातून शिळफाटा आणि पुढे ठाणे-मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या नागरिकांसाठी हा महत्त्वाचा मार्ग आहे. वाढत्या वाहनसंख्येमुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण होत असून प्रवाशांना त्याचा नियमित फटका बसत आहे. या पार्श्वभूमीवर आयआरबी, एमएमआरडीए, एमएसआरडीसी, ठाणे महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमआयडीसी आणि इतर संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली.
पाहणीदरम्यान रस्त्याचे रुंदीकरण अपूर्ण असलेल्या ठिकाणी निर्माण झालेले ‘बॉटलनेक’ दूर करण्यासाठी आवश्यक रस्तारुंदीकरण करण्यावर भर देण्यात आला. रस्त्यावरील खड्ड्यांची आरसीसी आणि मॅस्टिक डांबर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून टिकाऊ पद्धतीने दुरुस्ती करण्याच्या सूचनाही संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या.
काही ठिकाणी दुचाकी आणि चारचाकी वाहनांकडून राँग साईडने वाहतूक होत असल्याने अपघाताचा धोका आणि वाहतुकीतील अडथळे वाढत असल्याचे पाहणीत निदर्शनास आणण्यात आले. अशा अनधिकृत प्रवेशमार्गांना बंद करून नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याबाबत चर्चा झाली. आवश्यक चौकांमध्ये नवीन वाहतूक सिग्नल बसविण्याचेही निर्देश देण्यात आले.
रस्ता दुभाजक तोडून तयार करण्यात आलेल्या अनधिकृत मार्गांचाही आढावा घेण्यात आला. वाहतुकीच्या दृष्टीने आवश्यक ठिकाणीच नियोजनबद्ध प्रवेश ठेवून उर्वरित अनधिकृत मार्ग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
रस्त्यालगतची गॅरेज, हॉटेल आणि अन्य व्यावसायिक आस्थापनांमुळे होणाऱ्या अनधिकृत पार्किंगवर कारवाई करून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच वाहतुकीच्या मार्गात अडथळा ठरणारे महावितरणचे वीज खांब आणि रोहित्रे स्थलांतरित करण्यासाठी संबंधित विभागांशी समन्वय साधण्याचे ठरविण्यात आले.
वाहतुकीचा वेग वाढविणे, अपघातांचा धोका कमी करणे आणि नागरिकांना सुरक्षित व सुरळीत प्रवास उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयातून टप्प्याटप्प्याने कृती आराखडा राबवावा, यावर बैठकीत भर देण्यात आला.
या संयुक्त पाहणी दौऱ्यात आयआरबीचे महेश जोशी व सचिन दवे, एमएसआरडीसीचे अनिल शर्मा, ठाणे महापालिकेचे सचिन कदम, आदित्य डावखर, कार्यकारी अभियंता अर्जुन आव्हाड, एमआयडीसीचे कनिष्ठ अभियंता एन. एस. नवले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अरविंद चव्हाण तसेच सचिन भालेराव यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
स्थानिक नगरसेवक बाबाजी पाटील, उपतालुकाप्रमुख गणेश जयपाल, भरत भोईर, मुकेश पाटील, नकुल गायकर, गणेश मुंडे आणि संतोष वालीलकर यांनीही पाहणीदरम्यान स्थानिक नागरिकांच्या समस्या आणि सूचना अधिकाऱ्यांसमोर मांडल्या.
वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचा वेळ, इंधन आणि आर्थिक संसाधनांचा अपव्यय होत असल्याचे नमूद केले. तात्पुरत्या उपायांबरोबरच भविष्यातील वाढती वाहतूक लक्षात घेऊन कायमस्वरूपी आणि नियोजनबद्ध पायाभूत सुविधा विकसित करण्याची आवश्यकता.
कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे











Leave a Reply