कल्याण
शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चालना मिळावी आणि त्यांच्या कल्पकतेतून सामाजिक व पर्यावरणविषयक विचारांना अभिव्यक्ती मिळावी, या उद्देशाने सुभेदार वाडा कट्टा आणि रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने छत्री रंगवणे कार्यशाळा व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कल्याण येथील गुरुनानक इंग्लिश हायस्कूलमध्ये झालेल्या या आगळ्यावेगळ्या ‘रंगोत्सवा’त शहरातील दहा शाळांमधील शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
‘पर्यावरणाचे रक्षण करा’ आणि ‘पाणी वाचवा’ या विषयांवर विद्यार्थ्यांनी छत्र्यांवर आकर्षक चित्रे रेखाटत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. कागदावर चित्र काढण्यापेक्षा छत्रीच्या पृष्ठभागावर चित्र रंगवणे अधिक आव्हानात्मक असतानाही विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेची चुणूक दाखवली. पर्यावरण रक्षण, जलसंवर्धन आणि स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या विविध कलाकृतींनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
स्पर्धेत गुरुनानक इंग्लिश हायस्कूलची सानवी अभय गांगुर्डे हिने प्रथम क्रमांक पटकावला. होली क्रॉस हायस्कूलची आस्था सुशिलकुमार शिंदे द्वितीय, तर गुरुनानक इंग्लिश हायस्कूलची कार्तिकी सतीश पाटील तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली.
उत्तेजनार्थ पारितोषिकासाठी श्री वाणी विद्यालयाचा कर्दम विनीत गज्जर, होली क्रॉस हायस्कूलची धनश्री वैभव क्षीरसागर, मोहिंदर सिंग काबलसिंग हायस्कूलची खनक संतोष सुवर्णकार आणि सरस्वती मंदिर, कल्याणची अपूर्वा संजय भालके यांची निवड करण्यात आली. विजेत्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले, तर सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.
स्पर्धेचे परीक्षण रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याणच्या सदस्या सुखदा देशपांडे यांनी केले. विनोद शेलकर आणि यश महाजन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. गुरुनानक इंग्लिश हायस्कूलच्या प्राचार्य बलजीत कौर आणि पर्यवेक्षिका अर्चना तिवारी यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
सुभेदार वाडा कट्ट्याचे खजिनदार अर्जुन पाटील यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. तसेच रोटरी क्लब ऑफ न्यू इंडियाचे अध्यक्ष रमेश मोरे व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विनोद शेलकर यांनी केले.
विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला व्यासपीठ देतानाच पर्यावरण आणि जलसंवर्धनाचा संदेश देणारा हा आगळावेगळा ‘रंगोत्सव’ उपस्थितांच्या विशेष पसंतीस उतरला.
रंगोत्सवाचे मानकरी
प्रथम : सानवी अभय गांगुर्डे – गुरुनानक इंग्लिश हायस्कूल
द्वितीय : आस्था सुशिलकुमार शिंदे – होली क्रॉस हायस्कूल
तृतीय : कार्तिकी सतीश पाटील – गुरुनानक इंग्लिश हायस्कूल
उत्तेजनार्थ : कर्दम विनीत गज्जर, धनश्री वैभव क्षीरसागर, खनक संतोष सुवर्णकार आणि अपूर्वा संजय भालके.













Leave a Reply