ठाणे
सिकलसेल आजारावर वेळेत नियंत्रण मिळवण्यासाठी आणि पुढील पिढी सुरक्षित ठेवण्यासाठी राज्य शासनाचा सिकलसेल नियंत्रण कार्यक्रम ठाणे जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत ११ ते १७ डिसेंबर २०२५ या कालावधीत सिकलसेल जनजागृती सप्ताह आयोजित करण्यात आला आहे.
हा उपक्रम जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ व मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांच्या नेतृत्वाखाली अंमलात आणण्यात येत आहे.
ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत ११४ सिकलसेल रुग्ण व १,८५७ वाहक आढळून आले आहेत. जनजागृती सप्ताहाच्या कालावधीत आतापर्यंत २,८१० नागरिकांची तपासणी करण्यात आली असून त्यामध्ये २ वाहक व १ सिकलसेलग्रस्त रुग्ण आढळून आला आहे.
या सप्ताहाअंतर्गत नागरिकांसाठी मोफत सिकलसेल सोल्युबिलिटी चाचणी, इलेक्ट्रोफोरेसिस व HPLC तपासणी, रुग्णांना मोफत औषधोपचार, समुपदेशन, नियमित आरोग्य तपासणी, गरजेनुसार रक्त संक्रमण तसेच टेलिमेडिसीनद्वारे तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी स्पष्ट केले की, सिकलसेल हा अनुवंशिक आजार असून तो आई-वडिलांकडून मुलांमध्ये संक्रमित होतो. त्यामुळे विवाहपूर्व सिकलसेल तपासणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. वाहक-वाहक किंवा वाहक-रुग्ण विवाह टाळल्यास या आजाराचा प्रसार मोठ्या प्रमाणात रोखता येतो. तसेच सिकलसेलग्रस्त महिलांनी गर्भधारणेनंतर तातडीने गर्भजल तपासणी करून घ्यावी, असेही त्यांनी आवाहन केले.
सिकलसेल रुग्णांसाठी शासनामार्फत विविध लाभ दिले जात असून त्यामध्ये संजय गांधी निराधार योजना अंतर्गत दरमहा ₹२,५०० आर्थिक सहाय्य, इयत्ता १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेत अतिरिक्त वेळ, तसेच उपचारासाठी एस.टी. बस प्रवास सवलत यांचा समावेश आहे. जरी सिकलसेलवर पूर्ण उपचार उपलब्ध नसले, तरी योग्य औषधोपचार, नियमित तपासणी, संतुलित आहार आणि आवश्यक काळजी घेतल्यास हा आजार नियंत्रणात ठेवता येतो.
त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या नजीकच्या शासकीय आरोग्य केंद्रात सिकलसेल तपासणी करून घ्यावी व सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत उपलब्ध असलेल्या सेवांचा लाभ घ्यावा, असे कळकळीचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.













Leave a Reply