Power by The Web Cloud Media

ज्येष्ठ निरंकारी संत गुलाबचंदजी ब्रह्मलीन

उल्हासनगर

संत निरंकारी मिशनचे ज्येष्ठ पूज्य गुलाबचंदजी निरंकारी यांनी नुकतेच रविवारी सकाळी पाच वाजता आपल्या नश्वर देहाचा त्याग करून निराकार प्रभू मध्ये विलीन झाले. सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या असीम कृपेने आदरणीय गुलाबचंदजी अखेरपर्यंत मिशनचे ज्ञान प्रचारक म्हणून सेवारत होते. तत्पूर्वी त्यांनी संत निरंकारी मंडळाच्या उल्हासनगर झोनचे झोनल इन्चार्ज म्हणून १९९२ ते २०१८ पर्यंत त्यांनी सेवा निभावली.

गुलाबचंदजींचा जन्म १ जानेवारी १९२६ रोजी गाव खंबला जिल्हा सक्कर (आता पाकिस्तान) या ठिकाणी माता गणेशीजी आणि नेभराजलालजी यांच्या जमीनदार कुटुंबामध्ये झाला. १९४७ मध्ये भारत फाळणी नंतर पूर्ण कुटुंब भारतामध्ये कल्याणी कॅम्प (आजचे उल्हासनगर) येथे स्थायिक झाले. उदरनिर्वाहाकरिता गुलाबजी यांनी पोर्ट ट्रस्ट मुंबई या ठिकाणी नोकरी करण्यास सुरुवात केली. आपल्या वीस वर्षाच्या अथक सेवेनंतर गुरुच्या सेवाकार्यासाठी वेळ मिळावा म्हणून त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि पूर्णवेळ संत निरंकारी मिशनच्या कार्याला वाहून घेतले.

गुलाबजी यांना १९४९ मध्ये तत्कालीन सद्गुरु बाबा अवतारसिंहजी महाराज यांच्याकडून ब्रह्ज्ञानाची प्राप्ती झाली. सुरुवातीच्या काळात अनेक समस्यांना तोंड देत गुलाबजी यांनी उल्हासनगर क्षेत्र, ठाणे, पालघर जिल्हा त्याचबरोबर नाशिक, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांत सत्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी खूप मोठे योगदान दिले. त्यांचे समर्पण आणि भक्ती भाव बघता १९६६ मध्ये त्यांना ज्ञान प्रचारकाची सेवा देण्यात आली. १९९२ मध्ये मिशनच्या झोनल व्यवस्थेमध्ये करण्यात आलेल्या विविध परिवर्तनांनुसार गुलाबजी यांना उल्हासनगरचे क्षेत्रीय प्रबंधक म्हणून सेवा प्रदान करण्यात आली.

१९८६ मध्ये सद्गुरु बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या आदेशान्वये गुलाबजी सत्याच्या प्रचार प्रसारा करीता तीन महिन्याच्या विदेश यात्रेवर आग्नेय आशियात सिंगापूर, मनीला, हॉंगकॉंग, बँकॉक आदी ठिकाणी गेले. गुलाबजी वेळोवेळी सद्गुरूच्या आदेशान्वये आणि आशयानुसार सेवेसाठी तत्पर असत आणि त्यांच्या याच सेवा भावनेचे अनुकरण अनेक महात्म्यांनी केलं. त्यांची गुरुभक्ती आणि गुरुनिष्ठा निश्चितच अनुकरणीय आणि प्रेरणास्रोत असून त्यांच्या सेवा चिरकाल स्मरणात राहतील. सोमवारी सायंकाळी ६ वाजता शांतीनगर (उल्हासनगर) स्मशान भूमीत परिसरातील गणमान्य व्यक्ती आणि निरंकारी सतांच्या उपस्थितीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले गेले.

गुलाबजींच्या महान जीवनातून प्रेरणा घेण्यासाठी प्रेरणा दिवसाचे आयोजन मंगळवारी संध्याकाळी संत निरंकारी सत्संग भवन, शहाड येथे संत निरंकारी मंडळाचे महासचिव सुखदेवसिंहजी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. गुलाबजींच्या जीवनकार्याचा आढावा घेताना परम आदरणीय सुखदेवसिंहजी यांनी सांगितले, की गुलाबजी गुरुआशयानुसार आपले जीवित कार्य पूर्ण करून गेले ज्याची आध्यात्मिक दृष्ट्या प्रत्येक मानवाला गरज आहे. त्यांनी एक सुसंस्कृत कुटुंब निर्माण केलं ही त्यांची खरी संपत्ती असून हाच वारसा संतांनी वेळोवेळी या जगताला दिलेला आहे. त्यांनी केलेली भक्ती कायम स्मरणात राहील आणि येणाऱ्या काळामध्ये संतांना प्रेरणा देत राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *