कल्याण
साकेत महाविद्यालय आणि पोलीस आयुक्तालय, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने नशामुक्त भारत अभियान व सायबर गुन्हा जनजागृती कार्यशाळा 5 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत उत्साहात पार पडली. विद्यार्थ्यांमध्ये सजग नागरिकत्वाची भावना निर्माण करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलीस उपयुक्त, कल्याण परिमंडळ-3 चे अतुल झेंडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आठवड्यातून किमान एक दिवस ‘मोबाईल डिटॉक्स’ करण्याचे आव्हान दिले. “डिजिटल व्यसन ही नवीन पिढीची मोठी समस्या बनत आहे; स्वतःला time-out देणे अत्यावश्यक आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
दिशा सामाजिक मंडळाचे गौतम बेडकुळे यांनी नशाविरोधी सत्रात सांगितले की, “नशेच्या आहारी गेलेली व्यक्ती योग्य वेळी मार्गदर्शन आणि पाठिंबा मिळाल्यास पुन्हा सावरू शकते.”
सायबर पोलीस स्टेशन, ठाणे येथील पोलीस निरीक्षक सुदेश आजगावकर यांनी विद्यार्थ्यांना वाढत्या सायबर फसवणुकीबाबत जागरूक राहण्याचे आवाहन करताना म्हटले, “योग्य माहिती व सावधानता हीच सायबर सुरक्षेची खरी किल्ली आहे.”

या कार्यशाळेला सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण डॉ. कल्याणजी घेटे, पोलीस निरीक्षक कोळशेवाडी स्टेशनचे गणेश न्यायदे, संभाजी नाईक, साकेत ज्ञानपीठ शिक्षण संस्थेचे सचिव साकेत तिवारी, संस्थेच्या सदस्य डॉ. हेमा तिवारी, महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य डॉ. विजू प्रसिना, संस्थेच्या सीईओ श्रीमती शोभा नायर, साकेत कॉलेज ऑफ मॅनेजमेंटचे डायरेक्टर सनोज कुमार, साकेत कॉलेज ऑफ एज्युकेशनचे प्राचार्य विद्याप्रकाश मोरया, स्टडी व्हेज संस्थेचे अध्यक्ष उमाकांत चौधरी यांची उपस्थिती लाभली.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी ‘नशामुक्त भारत’ या विषयावर प्रभावी पथनाट्य सादर करून उपस्थितांना सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एनएसएस प्रकल्प अधिकारी प्रा. संजय चौधरी यांनी केले.













Leave a Reply