डोंबिवली, ता. 25
डोंबिवली येथील मानपाडा पोलीस ठाणे हद्दीत रिक्षात विसरलेली पैशांनी भरलेली बॅग पोलिसांनी अवघ्या तीन तासांत शोधून तक्रारदाराच्या ताब्यात दिल्याची घटना घडली असून पोलिसांच्या या तत्पर कामगिरीबद्दल नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
मानपाडा सर्कल परिसरात राहणारे नरेश आजाराम देवसी (वय 20) हे मानपाडा सर्कल ते नांदिवली दरम्यान रिक्षाने प्रवास करत असताना त्यांनी आपली बॅग रिक्षातच विसरल्याचे त्यांच्या लक्षात आले. सदर बॅगमध्ये 64 हजार 900 रुपये रोख रक्कम, सुमारे 30 हजार रुपये किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल फोन तसेच महत्त्वाची कागदपत्रे होती.
बॅग हरवल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संपत फडोळ यांनी तातडीने तपास पथकाची नियुक्ती केली.
या पथकात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील पवार तसेच पोलीस शिपाई विजय आव्हाड आणि सोपान शेळके यांचा समावेश होता. पोलिसांनी तांत्रिक तपास करत प्रवास मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पडताळणी करून संबंधित रिक्षा व चालकाचा शोध घेतला.
अवघ्या तीन तासांत हरवलेली बॅग संपूर्ण मुद्देमालासह तक्रारदारास परत देण्यात आली. मानपाडा पोलिसांच्या या जलद आणि प्रभावी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.













Leave a Reply