महापौर आणि आयुक्तांनी स्वगणना करून केली सुरुवात
कल्याण
महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या जनगणना 2027 प्रक्रियेतील पहिल्या टप्प्याचा स्वगणना अभियानाचा आजपासून अधिकृत शुभारंभ झाला आहे. या मोहिमेत नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापौर हर्षाली चौधरी आणि आयुक्त अभिनव गोयल यांनी केले आहे.
महापौर आणि आयुक्तांनी स्वतः स्वगणना करून या उपक्रमाची सुरुवात केली. त्यांनी सांगितले की, ही प्रक्रिया अत्यंत सोपी असून नागरिकांना केवळ 33 प्रश्नांची अचूक माहिती ऑनलाइन भरायची आहे. ही माहिती भरल्यानंतर मिळणारा SE ID (स्वगणना आयडी) जतन करून ठेवणे आवश्यक आहे. घरभेटीसाठी येणाऱ्या प्रगणकाला हा आयडी दिल्यास प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे.

ही स्वगणना प्रक्रिया 1 मे ते 15 मे 2026 या कालावधीत अधिकृत संकेतस्थळ https://se.census.gov.in वर जाऊन पूर्ण करता येणार आहे. देशातील सर्व नागरिकांसाठी ही माहिती 16 भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे, ज्यामुळे प्रत्येकाला सहज सहभाग घेता येईल.
महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले की, जनगणनेतून मिळणारी अचूक लोकसंख्येची माहिती शहराच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. यामुळे पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण आणि इतर सेवांचे नियोजन अधिक परिणामकारकपणे करता येईल.
जनजागृतीसाठी महापालिका मुख्यालयात विशेष उपक्रम राबवण्यात आले. महापौर हर्षाली चौधरी यांच्या हस्ते दोन सेल्फी पॉईंट्सचे अनावरण करण्यात आले. तसेच, जनगणना मोहिमेच्या प्रचारासाठी उभारलेल्या विशेष फलकावर महापौर, आयुक्त, पालिका सदस्य आणि अधिकाऱ्यांनी स्वाक्षरी करून सहभागाची नोंद केली.
महापालिकेने सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, या स्वगणना अभियानात सहभागी होऊन देशाच्या आणि शहराच्या विकासात आपला वाटा उचलावा.













Leave a Reply